Tanaji sawant Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळ्या भरलेली बंदुक खाली पडल्याने एक १३ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बाॅडीगार्डच्या घरी ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नितीन शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन हनुमंत शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकाने रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन एका बॅगेत ठेवले होते. ती बॅग त्यांनी कपाटात ठेवली होती. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे.
अभय शिर्के (वय 13) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिकची माहिती अशी की, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली होती.
त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घातला. त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
















